
नाशिक : राज्यात गुंतवणूक व्हावी यासाठी मॅग्नेट महाराष्ट्रसारखे कार्यक्रम घेतले जातात. तसेच दाओस येथे जाऊन महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक आणली जाते. या प्रत्येक बैठकीत नाशिकच्या वाट्याला काय, असा प्रश्न असतो व बऱ्याचदा त्याचे उत्तर नकारात्मक असते. मात्र, नाशिकचे धडाडीचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतलेल्या एका उद्योग बैठकीत नाशिक जिल्ह्यात ६ हजार ४०४ कोटी रुपयांचे सामंजस्य गुंतवणूक करार झाले आहेत. यामुळे नाशिकमध्ये १४२ नवीन उद्योग सुरू होणार असून त्यामाध्यमातून १४ हजार ४०३ रोजगार निर्मिती होणार आहे. या सामंजस्य करारांचे प्रातिनिधिक वितरण विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.
नाशिक शहरात गेल्या नव्वदच्या दशकानंतर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे. नाशिक शेतमाल, प्रक्रिया उद्योग आणि इतर औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीतही आघाडीवर आहे. राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे दोन दिवसांपूर्वी सकाळी हॉटेल द गेट वे येथे इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिंनी सोनार, उद्योग विभागाच्या सह संचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधिक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के, ‘निमा’चे अध्यक्ष ललित बूब, आयडीबीआय बँकेचे न्यू इंडिया इन्शोरन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप चव्हाण, एमसीसीआयए चे चेअरमन सी.एस.सिंग, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कांउन्सिलचे प्रादेशिक संचालक सी.एच.नादीगर यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
पर्यटन, वायनरी उद्योगास संधी
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिकला व वायनरी उद्योग व पर्यटन क्षेत्रास अधिक संधी आहे. येत्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाचा निश्चितच चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे रेल्वे व मुंबई पर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होणार आहे. नाशिक येथे सुरू झालेल्या विमानतळामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने नाशिक शहरासाठी रस्ते, मेट्रोसह विविध प्रकल्प साकारले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या दृष्टीन नाशिकचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे उद्योगांना गुंतवणुकीस मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
यावेळी श्रीमती सोनार यांनी इज ऑफ डूईंग बिझनेस व मैत्री 2.0 ची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सोनटक्के यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती, तर वाणी यांनी भारतीय डाक विभागाच्या योजनांची माहिती सादर केली. सिंग यांनी उद्योग क्षेत्रातील निर्यात व औद्योगिक परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. रिशी यांनी आडीबीआय बँकेच्या योजनांबाबत, तर श्री नदीगर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रासाठी व्यापार आणि गुंतवणूक संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सादर केली. प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य कराराचे वितरण विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
यात दोन तीन मोठया कंपन्या सोडल्या तर इतर गुंतवणूक ही लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील कंपन्यांची आहे.
गुंतवणूक बैठकीतील गुंतवणूक
मेसर्स व्हर्चुओसो ओप्टोइलेक्ट्रॉनिक्स : ३६२ कोटी रुपये गुंतवणूक
श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स : ३०० कोटी रुपये गुंतवणूक
किलिटेक हेल्थकेअर :३५८ कोटी रुपये
पैठणी क्लस्टर : १२.२९कोटी रुपये