लक्ष्मीकांत वाघवकर यांना बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार प्रदान
नाशिक : पाण्याचे समन्यायी वाटप ही धरणाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याची चळवळ आहे. त्यातून शेतकऱ्यांना आलेली समृद्धी या बाबी प्रेरणादायी आहे. ही चळवळ 35 वर्षांपासून सातत्याने वाढत गेली आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचे व्यवस्थापन सोपावणाऱ्या वाघाड सारखे अनेक प्रकल्प निर्माण करून या चळवळीला बळ देण्याचे काम करण्याची व ते काम टिकवून ठेवण्याचे काम समाज परिवर्तन केंद्र व इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभे राहावे, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी व्यक्त केली. निमित्त होते समाजपरिवर्तन केंद्राच्या स्व. बापू उपाध्ये स्मृती पुरस्काराचे. मेरीच्या नगरकर सभागृहात लक्ष्मीकांत वाघवकर यांना डॉ. संजय बेलसरे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. बेलसरे यांनी वाघवकर यांनी भरतभाऊ कावळे यांचा वारसा पुढे चालवत ही चळवळ राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिल्याचेही त्यांनी सांगितले.
समाज परिवर्तन केंद्राकडून दरवर्षी पाणी वापर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जातो. रोख 21 हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदा समाज परिवर्तन केंद्राचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत वाघवकर यांना जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरववण्यात आले.
यावेळी डॉ. संजय बेलसरे म्हणाले, पाण्याच्या समन्यायी वाटपाचे महत्व देशातील शेतकऱ्यांना आपण वाघाड धरणावरील पाणी वापर संस्थांच्या महासंघामुळे दाखवू शकतो व वाघाड हे समाज परिवर्तन केंद्राचे काम आहे. पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाण्याचा हक्क व पीक घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. राज्यात दुसरे वाघाड होऊ शकले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच त्यांनी याबाबाबत आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
वाघाडनंतर काटेपूर्णा, पेंच या प्रकल्पांवर पाणी वापर महासंघ स्थापन करून शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्थापन देण्यात आले. पण वाघाडसारखे यश मिळू शकले नाही.शेतकरी, जलसंपदा विभाग व समाजपरिवर्तन केंद्र यांच्या एकत्र येण्यातून हे यश मिळाले आहे, अशा शब्दात जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी पाणी वापर चळवळ व समाज परिवर्तन केंद्र यांचे कौतुक केले.

डॉ. बेलसरे म्हणाले, बापूसाहेब उपाध्ये यांनी सुरू केलेली पाणी वापर संस्थांची चळवळ त्यांच्यानंतर भरत कावळे यांनी यशस्वीरित्या सांभाळली. पुढे त्यांची जागा वाघवकर यांनी यशस्वीरित्या भरून काढली आहे. त्यांची पाणी वापर संस्थांप्रति असलेली तळमळ व निस्वार्थीपणे काम करण्याची वृत्तीमुळे आज त्यांची ओळख महाराष्ट्रभर झाली आहे.
कार्यक्रमास निवृत्त अधिकारी प्रकाश भामरे, राजेंद्र शुक्ला, आशिष देवगडे, वाघाड पाणी वापर महासंघाचे शहाजी सोमवंशी आदी उपस्थित होते. कुमार औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. सुधा माळी यांनी स्वागत केले. समाज परिवर्तन केंद्राचे सरचिटणीस अविनाश लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल देशपांडे यांनी मानपत्र वाचन केले.