राज्यमार्ग जोडून नाशिकभोवती होणार रिंगरोड

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा काळात मोठ्यासंख्येने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 56 किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, सरकारी यंत्रणेने तो मार्ग दोन वर्षात होणार नाही, याचे कारण सांगून जवळपास रद्द केला असून त्याऐवजी नाशिक शहराबाहेरून जाणारे व त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या सर्व राज्यमार्गांचे मजबुजतीकरण करण्यासाठी हजार कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे दुधाची तहान ताकावर भागावत राज्य मार्गांचे मजबुतीकरण करून नाशिक बाहेरून एक रिंगरोड तयार होईल याची काळजी घेण्यात आली आहे.

नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असताना त्यांनी नाशिक शहराबाहेरून रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी पुणे येथील कंपनीला सर्व्हे करण्याचे काम दिले होते. तो रिंगरोड खत प्रकल्प-देवळाली- चेहडी- आडगाव ट्रक टर्मिनल- म्हसरूळ-मखमलाबाद- गंगापूर-त्र्यंबकेश्वर मार्ग-अंबड-गरवारे पॉईंट, असा प्रस्तावित करण्यात आला होता. या बाह्यवळण मार्गाला साधारणपणे दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या बाह्यवळण मार्गाचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्यासमोर झाले. मात्र, हा रिंगरोड सिंहस्थापर्यंत होणे अशक्य असल्याचे कारण देत तो प्रस्ताव अमान्य करण्यात आला. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थानिमित्त जाणारे भाविक नाशिक शहरात न येता बाहेरून परस्पर कसे जाऊ शकतील, याचा समांतर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला. त्यात नाशिक शहराकडे येणाऱ्या प्रमुख मुंबई आग्रा महामार्ग, नाशिक पुणे महामार्ग, संभाजी नगर मार्ग, पेठ नाशिक मार्ग, दिंडोरी नाशिक मार्ग, समृद्धी महामार्ग याना राज्यमार्गाने जोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिकच्या कोणत्याही दिशेने आलेली वाहने नाशिक शहरात न येता थेट त्र्यंबकेश्वरला जाऊ शकणार आहेत.

मुंबई आग्रा महामार्गाद्वारे धुळेकडून येणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी आडगाव-म्हसरूळ-मखमलाबाद- गिरणारे- त्र्यंबकेश्वर या मार्गाचे मजबुतीकरण केले जाणार आहे.
नाशिक पुणे मार्गे येणाऱ्या भाविकांना चिंचोली पांढुर्ली- वाडीवरहे- पहिने त्र्यंबकेश्वर हा मार्ग, समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांना घोटी ते त्र्यंबकेश्वर राज्य मार्ग व पेठ व दिंडोरी रोड या मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पेठ-हरसूल-तोरंगण-त्र्यंबकेश्वर या मार्गाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. तसेच दिंडोरी रोड मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दिंडोरी-उमराळे- तळवाडे हा या मार्गाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या राज्य मार्गांचे मजबुतीकरण करून नाशिक शहाराबाहेरून जाणाच्या रस्त्यांचा आपोआप रिंगरोड तयार होणार आहे.

या मार्गांचे मजबुतीकरण
नाशिक -त्र्यंबकेश्वर काँक्रीटीकरण : 350 कोटी
नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी मजबुतीकरण : 100 कोटी

नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पूल : 15 कोटी

दुगाव ते जऊळके त्र्यंबकसाठी : 215 कोटी

भरवीर- टाकेद- बेजे यासाठी : 119 कोटी

चिंचोली-वडगाव पिंगळा-विंचूर दळवी-पांढुर्ली रस्ता : 207 कोटी

वाडीवर्हे- दहेगाव- जातेगाव- तळेगाव- महिरावणी-दुडगाव- गणेशगाव रस्ता : 200 कोटी

दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता : 163 कोटी

त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड जोपुळ-पिंपळगाव : 215 कोटी

दुगाव- जुने घागुर- ढकांबे-आंबे दिंडोरी, जऊळके रस्ता : 163 कोटी

पेठ- तोरंगण-हरसूल-वाघेरा- अंबोली-पहिने- घोटी रस्ता : 205 काटी

जानोरी-ओझर विमानतळ : 50 कोटी

आडगाव- गिरणारे-वाघेरा- हरसूल- ओझरखेड रस्ता : 157 कोटी

त्र्यंबकेश्वर-देवगाव- खोडाळा रस्ता : 47 कोटी