
मराठी बिल्डरची पोलीस संरक्षणाची मागणी
नाशिक : नाशिक शहरात मुंबई आग्रा महामार्गालगत स्प्लेंडर हॉल शेजारील चढ्ढाचैतन्य कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या श्रीरंग शंकर आव्हाड यांना व्यवसायिक वादातून परप्रांतीय व्यावसायिकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत आव्हाड यांनी इंदिरानगर पोलिसात ऑनलाइन तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. यापूर्वीही आव्हाड यांच्या घरावर रात्रीच्यावेळी दगडफेक करण्यात आली होती. त्याबाबतही इंदिरानगर पोलिसांनी केवळ अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली व दगडफेकीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला नाही.
यामुळे श्री. आव्हाड यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे संरक्षण मागितले आहे.
चढ्ढाचैतन्य कॉम्प्लेक्सची जागा चढ्ढा यांच्या मालकीची असून ती जागा विकसित करण्यासाठी पार्थ बिल्डकॉन यांनी घेतली होती. पुढे त्यांच्यात विवाद निर्माण झाल्यानंतर 20 वर्षांपासून तो प्रकल्प रखडला आहे. चढ्ढा व पार्थ बिल्डकॉनचे संचालक श्रीरंग आव्हाड यांच्यात जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान आव्हाड यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिलेल्या निवेदनानुसार 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास चढ्ढा कुटुंबातील एक जण व इतर अनोळखी तिघे चारचाकी वाहनातून चढ्ढा चैतन्य कॉम्प्लेक्स येथे आले व त्यांनी आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तत्पूर्वी आव्हाड यांचे वॉचमन यांनाही धमकी दिली. त्यानंतर श्री. आव्हाड यांनी याबाबत ऑनलाईन तक्रार केली. मात्र, त्या तक्रारीची पोलिसांनी अद्याप दखल घेतली नाही.
दरम्यान श्री. आव्हाड राहत असलेल्या चैतन्य कॉम्प्लेक्स, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास दगडाचा वर्षाव केला व त्यात खिडकीच्या काचा फुटल्या.आव्हाड यांनी आपत्कालीन पोलिस सहाय्यता क्रमांकावर फोन करुन मदत मागितली. मात्र, कोणीही आले नाही. त्यानंतर त्यांनी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, केवळ अदखलपात्र तक्रार दाखल करून घेण्यात आली व घटनेचा पंचनामा करण्यास पोलीस आले नाही, त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. आव्हाड हे चढ्ढा चैतन्य कोप्लेक्स येथे कुटुंबियांसह राहत आहेत. तसेच त्यांचे वॉचमन कुटुंबही तेथे इमारतीच्या आवारात राहत आहे. दोन्ही कुटुंबाच्या जीविताला धोका होईल, अशी कोणतीही अनुचित घटना घडण्याअगोदर संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली आहे.
जैसे थे आदेश
कंवरजितसिंग राजेंद्रसिंग चड्डा व त्यांचे भाऊ इंदरपालसिंग राजेंद्रसिंग चड्डा व पुतण्या करणसिंग रविंद्रसिंग चड्डा व त्याची आई किरणपाल कौर रविंद्रसिंग चड्डा यांच्यात आणि पार्थ बिल्डकॉन प्रा. लि. चे संचालक श्रीरंग आव्हाड यांच्यात मिळकतीच्या बाबत सिव्हील कोर्ट सिनिअर डिव्हीजन नाशिकमध्ये दावा सुरू आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना जैसे थे आदेश दिलेला आहे.