झेडपी, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्तीची तयारी

फ्री मीडिया
नाशिक : महानगरपालिकेत जे राजकीय कार्यकर्ते निवडणूक लढवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्वीकृत सदस्य नियुक्तीची ही सोय केलेली असते. त्याच पद्धतीने आता राज्य सरकार जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्येही स्वीकृत सदस्य पद्धत नव्याने सुरू करण्याच्या विचारात आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून मुख्यमंत्र्यांनीही ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये पुन्हा स्वीकृत सदस्य नियुक्ती होणार असल्याचे दिसत आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या पत्रात स्वीकृत सदस्य पद्धत पुन्हा सुरू करण्याबाबत म्हटले आहे की, ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.अधिनियमातील तरतुदींनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. परंतु सध्याच्या धोरणानुसार या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने या अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी ०५ (पाच) व पंचायत समितीसाठी ०२ (दोन) स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी, अशी विनंती केली आहे.
सरकारने वरीलप्रमाणे निर्णय घेतल्यास समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

पाच स्वीकृत सदस्य
जिल्हा परिषदेत दोन स्वीकृत सदस्य नियुक्ती करण्याची तरतूद जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये आहे. मात्र ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर ही सदस्य नियुक्तीची पद्धत बंद झाली. अधिनियमातजिल्हा परिषदेत सरकारला दोन सदस्य नियुक्तीची तरतूद आहे. मात्र, सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने दोन सदस्य नियुक्तीवरून सत्ताधारी पक्षांमध्ये विवाद निर्माण होऊ शकतो, हे गृहित धरून महसूलमंत्री मंत्र्यांनी अधिनियमात दुरुस्ती करून ती संख्या पाच करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे दिसत आहे.

Loading

खाली WhatsApp, Twitter, Facebook वर क्लिक करा आणि अधिक बातम्या मिळवा!

🟢 निष्पक्ष बातम्या आणि विश्लेषण वाचण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला Join करा