माणिकराव यांचे काय आणि कुठे चुकतेय ?

श्याम उगले
नाशिक :
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद घालवणे हेच आपले एकमेव इप्सित आहे, अशा अविर्भावात सध्या मराठी माध्यमे वावरत आहेत. माणिकराव कोकाटे हे धडाडीचे आमदार असून त्यांनी मागच्या सिन्नर तालुक्यात कार्यकाळात पाच वर्षात एक नदीजोड प्रकल्प पूर्ण करून सिन्नरसाठी दुसऱ्या नदीजोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळवली. एका विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात 15 हजार कोटींची कामे मंजूर करणारे ते राज्यातील एकमेव आमदार असावेत. मात्र, कृषिमंत्री झाल्यापासून त्यांना साडेसातीने घेरले की काय, अशी शंका येत आहे. या परिस्थितीत माणिकराव यांनी कशावर लक्ष केंद्रित करावे, याबाबत न मागता दिलेला सल्ला….

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेत कामकाजानिमित्त उपस्थित असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर एक पत्त्याचा गेम दिसत आहे, असा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्स या1 हँडलवर प्रसिद्ध केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर आक्रमक शैली आणि फटकळपणे समोरच्याला अपमानित करण्याचा स्वभाव यामुळे ते माध्यमांमध्ये सुरुवातीच्या काळापासून लाडके बनले. मात्र, माध्यमांचे लाडके झालेले माणिकराव दोडके कधी झाले हे त्यांनाही कळले नाही. माणिकराव कोकाटे यांच्या विधानातील एखादा शब्द किंवा वाक्य उचलायचे आणि त्यावरून बघा माणिकराव काय बोलत आहेत, असे आपल्या प्रेक्षकांना ओरडून सांगायचे, असा टीव्ही मीडियाचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा पत्रकारांना प्रश्न विचारला होता. तेवढ्यावरून त्यांना टीकेचे धनी करण्यात आले होते. त्याआधीही माणिकराव कोकाटे यांनी आपण भिकाऱ्याला एक रुपया देत नाही आणि येथे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो, अशा आशयाचे विधान केले होते, त्यावरूनही माणिकराव यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले, असा गवगवा करण्यात आला होता.

गेल्या सात-आठ महिन्यांमधील माणिकराव कोकाटे यांची अशी अनेक विधाने माध्यमांनी चर्चेत आणली आणि माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री म्हणून काम करण्यास कसे लायक नाहीत, असे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात यात माणिकराव यांचेही तितकेच तोलामोलाचे योगदान आहे. माध्यमे आपला बळीचा बकरा बनवू पाहत आहेत हे लक्षात आल्यानंतर माणिकराव यांनी माध्यमांपासून सुरक्षित अंतर ठेवणे योग्य असताना ते माध्यमांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत, येथेच ते अलगदपणे मीडियाच्या सापळ्यात अडकले आहेत. आताही रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या हँडलवर माणिकराव यांचा व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांनी एकदा माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा त्या विषयात पडण्याची गरज नव्हती. मात्र, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कृषीसमृद्धी या योजनेची घोषणा करून व त्याची माहिती देण्यासाठी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. माणिकराव यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे, हे समजताच माध्यमांनी पुन्हा ‘माणिकराव माफी मागणार का राजीनामा देणार’, अशी पतंगबाजी केली.

माणिकराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये कृषी समृद्धी योजना काय आहे? ती कशासाठी आहे, याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर समोर उपस्थित असलेल्या एकाही पत्रकाराने त्या योजनेच्या अनुषंगाने एकही प्रश्न विचारला नाही. माणिकराव कोकाटे यांनी योजनेची माहिती सांगून पूर्ण झाल्यानंतर त्यांना विधिमंडळातील व्हिडिओ व यापूर्वी त्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य यावर त्यांची उलट तपासणी सुरू केली. त्या प्रश्नांना माणिकरावही हिरीरीने उत्तरे देत राहिले. त्यात आपण कसे चुकीचे बोललेलो नाही किंवा चुकीचे काही केलेले नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांनी आपल्याला चुकीचे ठरवले आहे किंवा आपल्याला चुकीचे ठरवण्यासाठीच जे टपून बसलेले आहेत, अशा लोकांसमोर आपण कितीही पोटतिडकेने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला गुन्हेगारच ठरवण्याचा प्रयत्न करतात, हा साधा नियम माणिकराव कोकाटे यांच्या लक्षात आला नाही आणि वीस पंचवीस मिनिटे पत्रकार परिषदेमध्ये ते माध्यम प्रतिनिधींशी अक्षरशा हुज्जत घालत राहिले. अखेर दोन्ही बाजू थकल्या आणि पत्रकार परिषद सादरीकरण करण्याकडे वळली.

माणिकराव यांच्या बोलण्याच्या शैलीचा काटा आक्रमक आणि थोडासा तुसडेपणाकडे सरकणारा आहे. यामुळे माणिकराव पत्रकारांबरोबर जणू काही भांडण करत आहेत, असे त्या पत्रकार परिषदेचे दृश्य बनले होते. ‘आपण काही चुकीचे वागलेलो नाही, चुकीचं केलेलं नाही, आपली बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचले जाईल’. विधिमंडळातील व्हिडिओची चौकशी करावी व हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मी चुकीचं केलेला आहे, असे निवेदन दिल्यास राज्यपालांकडे राजीनामा देईन, अशी अनेक वक्तव्य माणिकराव यांनी केली. बोलण्याच्या ओघांमध्ये किंवा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना माणिकराव यांनी आपण शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं नव्हतो. जसे आपण एखाद्या भिकाऱ्यालाही एक रुपया देतो, तसे पीकविम्याच्या रकमेपोटी शेतकरी सरकारला एक रुपया देतात, म्हणजे येथे सरकार भिकारी आहे. यामुळे शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याचा संबंध येतोच कोठे, असे सांगण्याचा प्रयत्न माणिकराव करत असताना त्यातील ‘सरकार भिकारी’ एवढा एकच शब्द उचलून पुन्हा माणिकराव यांनी सरकारला भिकारी म्हटले, अशा बातम्या चालवण्यास सुरुवात झाली. म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी कोणतेही विधान केले, तरी त्या विधानाचा विपर्यास केला जाणार, ही बाब स्पष्ट झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये माणिकराव यांनी माध्यमांसोबतचा आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे.

पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये कृषिमंत्री म्हणून आपण कसे चांगले काम केले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आपण कृषी विभागामध्ये कसे नवीन बदल घडवत आहोत आणि त्याचे परिणाम कसे दिसत आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, माध्यमांना कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना यापेक्षा आपल्याला ट्विस्ट करण्यासाठी माणिकराव यांच्या तोंडातून एखादं वाक्य किंवा शब्द कधी बाहेर पडतो, याचीच त्यांना अधिक उत्सुकता असल्याचे दिसले. ज्यांना आपले म्हणणे ऐकून घ्यायचे नाही, ज्यांना शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये रस नाही, त्यांच्यासमोर डोके आपटून रक्तबंबाळ केले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, हे माणिकरावांच्या लक्षात आले नाही. परिणामी व्हिडिओमुळे आधीच प्रतिमा मलिन झालेले माणिकराव कोकाटे यांची प्रतिमा पत्रकार परिषदेनंतरही अधिक मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात याला स्वतः माणिकराव जबाबदार आहेत. माध्यमांनी एखाद्या व्यक्तीला नालायक ठरवल्यानंतर आपले म्हणणे खरे करण्यासाठी माध्यमे कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या देशाने अनेकदा पाहिले आहे.

गुजरात दंगलीमध्ये नरेंद्र मोदी हे दोषी आहेत हे माध्यमांनी एकदा ठरवून टाकल्यानंतर ते पंतप्रधान होईपर्यंत माध्यमांनी त्यांचा पाठलाग सोडला नव्हता. ठिकाण कोणतेही असो, प्रश्न एकच असायचा. मात्र, एकदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनीच माध्यमांना आपल्या गरजेनुसार वापरण्याची नवीन व्यूहनीती तयार केली. यामुळे एका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानंतर दुसऱ्या निवडणूक प्रचारापर्यंत ते मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेशी थेट संवाद साधण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. भारतातील सर्वात शक्तिमान पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा माध्यमांची वाकडी शेपूट सरळ करू शकले नाही, तर माणिकराव त्या तुलनेत फार लहान नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये माध्यमांवर शिंगे उगारण्याचा त्यांचा अट्टाहास त्यांनाच अडचणीत आणत आहे.

माध्यमांपासून सुरक्षित अंतरावर राहणे आपल्या गरजेपुरताच माध्यमांचा वापर करणे या बाबी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत. अन्यथा माध्यमांनी एकदा माणिकराव यांची इमेज बनवलेलीच आहे व आपण तयार केलेली माणिकरावांची इमेज आम्ही म्हणतो तशीच आहे, हे ठसवण्यासाठी माध्यमे भविष्यातही वारंवार प्रयत्न करणार आहेत, हे माणिकराव यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांची शक्ती कृषी विभागाच्या कामकाजावर खर्च होण्यापेक्षा माध्यमांनी केलेल्या विपर्यासाचे खुलासे करण्यातच खर्च होईल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Loading

खाली WhatsApp, Twitter, Facebook वर क्लिक करा आणि अधिक बातम्या मिळवा!

🟢 निष्पक्ष बातम्या आणि विश्लेषण वाचण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला Join करा