भोजापूर डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला १४ कोटींची प्रशासकीय मान्यता

५० वर्षांत पहिल्यांदाच होणार दुरुस्ती

फ्री मीडिया
नाशिक : सिन्नर तालुक्यातील भोजपूर धरणाच्या डावा कालवा तथा दोडी शाखेचा कालवा, चारी क्रमांक एक ते चार यांच्या नूतनीकरण व दुरुस्तीसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने १४.४६ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांमध्ये याच शाखेच्या पूर चाऱ्यांच्याही कामांचा समावेश आहे. ही दुरुस्तीची कामे झाल्यानंतर भोजपूर धरणातील पूरपाणी दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, माळवाडी, खंबाळे, भोकणी, दातली या गावांमधील बंधारे पावसाळ्यात पाण्याने भरून घेता येणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून भोजापूर धरणावरील पाणी वापर संस्था हस्तांरणाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे दोडी शाखेच्या डाव्या कालव्यांची ५० वर्षांत पहिल्यांदाच दुरुस्ती होणार आहे.
सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात १९७२ मध्ये म्हाळुंगी नदीवर भोजपुर धरण बांधण्यात आले असून त्याच्या उजव्या कालव्यास नांदूर शाखा व डाव्या कालव्याला दोडी शाखा संबोधले जाते. धरणाचे लाभक्षेत्र ४५०० हेक्टर असून डाव्या कालव्यावरील दोडी शाखेचे लाभक्षेत्र २१०० हेक्टर आहे. दोडी शाखेवर २०१३ मध्ये पाच पाणीवापर संस्था स्थापन झालेल्या असून गेल्या ११ वर्षांपासून या पाणी वापर संस्था शेतकऱ्यांकडून सिंचनाचे व्यवस्थापन या कायद्यानुसार सिंचन करीत आहेत. दरम्यान या कालव्यांची १९७५ ते १९८० दरम्यान उभारणी केल्यापासून एकदाही दुरुस्तीचे काम झालेले नाही. आवर्तनापूर्वी पाटातील गवत काढणे व कधी कधी पाटातील गाळ काढणे या पलीकडे कामे झालेली नाहीत. परिणामी या डाव्या कालव्यावरील चाऱ्यांचे गेट नादुरुस्त झालेले आहेत, आउटलेट उखडले गेले आहेत. चाऱ्यांच्या मुखाशी पाणी मोजण्याचे यंत्र नसल्याने पाणी वापर संस्थांना सिंचन करताना मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या डाव्या कालव्याची ठिकठिकाणी नादुरुस्ती झाली असल्याने पूर्ण क्षमतेने कालवा चालवता येत नाही. तसेच सिमेंटचे अस्तर अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्याने तेथे पाण्याची मोठ्याप्रमाणावर गळती होते. यामुळे पाण्याची नासाडी होण्याबरोबरबरच कालव्यालगतच्या शेतीचेही नुकसान होत असते. या दुरवस्थेमुळे पाणी वापर संस्थांना पाणी मोजून घेणे व ते पाणी सिंचनासाठी देणे, याबाबी करताना मोठी कसरत करावी लागते. यामुळे पाणी वापर संस्थांनी आतापर्यंत कालवा हस्तांतरण करून घेण्यास विरोध केलेला आहे. आधी कालवा व चाऱ्यांची दुरुस्ती करा, त्यानंतरच पाणी वापर संस्था कालवा हस्तांतरित करेल, अशी भूमिका पाणी वापर संस्थांनी घेतली आहे. समाज परिवर्तन केंद्राचे स्व. भरतभाऊ कावळे यांनीही या कालव्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनानंतर हा विषय मागे पडला. मात्र, भोजापूरचे उपविभागीय अभियंता सुभाष पगारे यांनी या कालव्यांच्या दुरुस्तीचे सर्वेक्षण करून घेऊन प्रस्ताव तयार केला. त्यात लघु पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता अविनाश लोखंडे यांनी क्रीडा व युवक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निर्देशानुसार डाव्या कालव्यावरील पूर कालवे दुरुस्तीचे सर्वेक्षण केले होते. भोजापूर धरणातून २५१ दलघफू पुरपाणी वापरण्यास १९७५ ते १९८५ या काळात सरकारने मंजुरी दिलेली आहे. मात्र, कालव्यांची दुरवस्था झाल्याने पुरपाणी संबंधित गावांपर्यंत पोहोचवणे अवघड होत आहे. यामुळे पूर कालवे दुरुस्तीचा या कामांत समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही कामांना जलसंपदा विभागाने एकत्रित १४.४६ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांना लवकरच तांत्रिक मान्यता घेऊन टेंडर प्रक्रिया राबवण्याच्या सूचना प्रशासकीय मान्यतेत देण्यात आल्या आहेत.

Loading

खाली WhatsApp, Twitter, Facebook वर क्लिक करा आणि अधिक बातम्या मिळवा!

🟢 निष्पक्ष बातम्या आणि विश्लेषण वाचण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला Join करा