नाशिकच्या १५ पं.स. सभापतींचे आरक्षण जाहीर

या आठ पंचायत समितींचे सभापती असणार आदिवासी

फ्री मीडिया
नाशिक : जिल्हा प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, नाशिक व मालेगाव या आठ पंचायत सामित्यांचे सभापती पद हे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे. उरलेल्या सात पंचायत समित्यांमध्ये चार ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गांसाठी आरक्षण असणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून रखडल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून पावसाळा व सणउत्सव या कारणामुळे निवडणूक घेता येणे शक्य नसल्याने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेऊ असे सांगितले. त्यानुसार आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 31 जानेवारीपर्यंत होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित केले असून नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे. त्याचवेळी राज्य निवडणूक आयोगाने पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण कसे निश्चित करायचे याबाबत जिल्हा प्रशासनास मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर या चार पंचायत समित्यांच्या या पूर्ण पेसा क्षेत्र असल्याने तेथील सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच दिंडोरी तालुक्यातील 50 टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या अनुसूचित जमातीची असल्याने तेथेही अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना होत्या. याशिवाय उरलेल्या 10 पंचायत समितीमध्ये तीन सभापती पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्याच्याही सूचना होत्या. या सूचनांच्या अधीन राहून जिल्हा प्रशासनाने सर्व 15 पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निश्चित केले आहे. त्यात 8 पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी, इगतपुरी या एका पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती या प्रवर्गसाठी, बागलाण, येवला, देवळा चांदवड या ठिकाणचे सभापतीपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग व उरलेले सिन्नर व नांदगाव येथील सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गसाठी आरक्षित असणार आहे.

पंचायत समितिनिहाय सभापती आरक्षण

कळवण – अनुसूचित जमाती
सुरगाणा – अनुसूचित जमाती
पेठ – अनुसूचित जमाती महिला
त्र्यंबकेश्वर – अनुसूचित जमाती महिला
दिंडोरी – अनुसूचित जमाती महिला
निफाड – अनुसूचित जमाती
नाशिक – अनुसूचित जमाती
मालेगाव – अनुसूचित जमाती महिला
इगतपुरी – अनुसूचित जाती महिला
बागलाण – ओबीसी
येवला – ओबीसी
देवळा – ओबीसी महिला
चांदवड – ओबीसी महिला
सिन्नर – सर्वसाधारण
नांदगाव – सर्वसाधारण महिला

Loading

खाली WhatsApp, Twitter, Facebook वर क्लिक करा आणि अधिक बातम्या मिळवा!

🟢 निष्पक्ष बातम्या आणि विश्लेषण वाचण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला Join करा